रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध; दत्तवाडी, साने गुरुजीनगर परिसरात रासने यांची पदयात्रा

पुणे – रिक्षा हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. रिक्षाचालकांना एकेरी हाक न मारता अहो, रिक्षावाले काका, असे म्हणण्याचे संस्कार आणि संस्कृती स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी निर्माण करून या व्यावसायिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानुसार रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची भावना कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली.
दत्तवाडी, साने गुरुजीनगर परिसरात रासने यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. धीरज घाटे, धनंजय जाधव, प्रशांत सुर्वे, विजय गायकवाड, दीपक पोटे, तानाजी ताकपिरे, चंद्रकांत पोटे, अश्विनीताई पवार, शैलेश लडकत, सुनीता जंगम, केदार मानकर, विशाल पवार, आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, की महायुती सरकारने राज्यातील रिक्षाचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नावाने महामंडळ स्थापन केले आहे. या मंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षाचालकाला जीवन विमा कवच आणि मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत.
अपघातात जखमी झाल्यास तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये दिले जातील. रिक्षाचालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तर उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल करण्यात येणार आहे. या सर्व योजना कसबा विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविणार आहे.
नवे रिक्षा धोरण राबविणार
रिक्षाचालकांप्रती कृतज्ञतेच्या भावनेने मध्य वस्तीतील १२०० रिक्षाचालकांना गणवेश वितरित करण्यात आले. त्यांच्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. रिक्षाचालकांना सक्तीचा केलेला दररोजचा ५० रुपयांचा वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड रद्द करावा, यासाठी आग्रही राहीन. रिक्षा ॲपसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, मेट्रोला पूरक नव्याने शेअर रिक्षा धोरण राबविणार असल्याचेही रासने म्हणाले.





