सातारा – वर्णे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द

कामेरी – वर्णे व परिसरातील सर्व वाड्या-वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी दिली.
वर्णे (ता.सातारा) येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या ४७ लाख रूपयांचा विविध विकासकामांचा भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरपंच रमेश पवार, अरूणा बर्गे व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, यापूर्वी ही या गावात व परिसरात अनेक दर्जेदार विकासकामे झाली असून येत्या काळात देखील अनेक कामे प्रस्तावित आहेत. या सर्व कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच अजूनही काही विकासकामे असल्यास ती गावाने एकमुखाने सुचवावीत ती देखील मंजूर करून दर्जेदार करण्यासाठी आपण बांधिल आहोत.
यावेळी १५ लाख रूपयांचे गावंतर्गत रस्ते ट्रीमीक्स कॉक्रीट करणे तसेच ३२ लाखांचा वर्णे ग्रामपंचायत ते जानाईनगर रस्ता मजबूतीकरण करून डांबरीकरणासह नूतनीकरण या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.





