IAS Tukaram Mundhe : पदभार स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका; भेसळखोरांचे धाबे दणाणले
IAS Tukaram Mundhe : भेसळविरोधी मोहिमेचा वेग आगामी काळात आणखी वाढणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

IAS Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव येथे सलग दोन दिवसांत झालेल्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (२६ मे) अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे छापा टाकण्यात आला. आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर २० हजार रुपये किमतीचे सुमारे ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले.
त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथेही कारवाई करत निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त करण्यात आले. या कारवाईत ४० हजार ९६० रुपये किमतीचा साठा ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान, बुधवारी (२७ मे) धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून ४७ हजार ३०० रुपये किमतीचा २१५ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त केला. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
“कारवाई सुरूच राहणार”
निकृष्ट, भेसळयुक्त आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ तसेच फळे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ग्राहकांना दर्जेदार, भेसळमुक्त आणि रसायनमुक्त अन्नपदार्थ मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंतची कारवाई –
निमगाव केतकी (ता. इंदापूर) : २० हजार रुपये किमतीचे ८०० किलो आंबे जप्त
छत्रपती संभाजीनगर : ४० हजार ९६० रुपये किमतीचे निकृष्ट गायीचे तूप जप्त
येरमाळा (जि. धाराशिव) : ४७ हजार ३०० रुपये किमतीचा २१५ किलो खवा जप्त
भेसळविरोधी मोहिमेचा वेग आगामी काळात आणखी वाढणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.




