Tukaram Mundhe : कडक शिस्त, पारदर्शक कारभार आणि निर्भीड निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. गेल्या 21 वर्षांच्या सेवेत तब्बल 24 वेळा बदली होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला असून, प्रशासकीय व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2005 बॅचचे अधिकारी असलेले मुंढे यांची ‘सिंघम’ अशी प्रतिमा असून, ते ज्या विभागात जातात तिथे शिस्त आणि पारदर्शकता आणण्यावर भर देतात. सध्या ते दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांची बदली करत मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तसेच महसूल आणि वन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी तीन महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. नियमानुसार एखाद्या अधिकाऱ्याने एका पदावर किमान तीन वर्षे काम करणे अपेक्षित असते. मात्र मुंढे यांच्या बाबतीत सरासरी वर्षभरातच बदली होण्याची परंपरा कायम राहिली आहे. त्यांच्या कठोर आणि राजकीय दबावाला न जुमानणाऱ्या कार्यशैलीमुळेच त्यांची वारंवार बदली होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात काम करताना अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली होती. तसेच गैरप्रकारांवर कारवाई करत प्रणालीत सुधारणा घडवून आणली होती. त्यांच्या कारभारामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध विभागांचे सचिव अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. नाशिक, नागपूर, नवी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये त्यांनी ठसा उमटवला आहे. आता आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसनसारख्या संवेदनशील विभागाची जबाबदारी मिळाल्यामुळे, आगामी काळात मुंढे कोणते निर्णय घेतात आणि ‘मुंढे स्टाईल’ प्रशासन कसे राबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. IAS तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर. सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग. जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर. मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग. जुलै 2009 – सीईओ, वाशिम. जून 2010 – सीईओ, कल्याण. जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना. सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई. नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी. मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका. मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे. फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका. नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन. डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई. जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका. ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई. जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत. सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान. एप्रिल 2023 – सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास जून 2023 – सचिव मराठी भाषा विभाग जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव जून 2024 – विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग ऑगस्ट 2025- सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त मंत्रालय आता आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन सारख्या संवेदनशील विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात या विभागात ते कोणती ‘मुंढे स्टाईल’ शिस्त लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.