Electricity : वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नवीन वीज दर आदेशावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 28 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. 1 एप्रिल 2025 पासून नव्या दरकपातीचा निर्णय लागू होणार होता, परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणले आहे. त्यामुळे, आता महावितरणकडून करण्यात आलेल्या दरकपातीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
महावितरणच्या वकिलांनी सांगितले की, या वीज दर आदेशातील चुका आणि विसंगती या वर्ष 2025-26 ते 2029-30 या पाच वर्षांच्या नियामक कालावधीतील वीज दराच्या मूळ स्वरूपावर परिणाम करत आहेत. तसेच, हा दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे आणि अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी महावितरणने केली आहे.
महावितरणच्या वकिलांनी यासंदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिल 2025 च्या अखेरीस सादर केली जाईल, असे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने 28 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या नवीन वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच, महावितरणची पुनरावलोकन याचिका दाखल होईपर्यंत 31 मार्च 2023 रोजी जाहीर झालेला आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी लागू असलेला जुना दरच लागू राहील, असेदेखील आयोगाने स्पष्ट केले आहे.




