भाष्य : मावळातील आजी-माजी आमदारांमध्ये रंगले ‘लेटरवॉर’ !

भाष्य (प्रकाश यादव) : मावळात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असतानाच राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात पुन्हा एकदा “लेटरवॉर’ रंगले आहे. आजी-माजी आमदारांनी मावळचा विकास, बेरोजगारांच्या हाताला रोजगार कसा मिळेल, यावर भाष्य करण्याचे सोडून एकमेकांची उणी-दुणी काढत बसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मनोरंजन होऊ लागले आहे. त्यामुळे या दोन्ही मान्यवरांनी आता “लेटरवॉरला’ फूल स्टॉप देऊन लोकाभिमूख आणि विकासात्मक भूमिका घ्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे!
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी क्रशर व्यावसायिकांकडून आपल्या जीवाला धोका असून आपली सुरक्षा वाढवावी, अशा मागणीचे पत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले. या पत्रात त्यांनी क्रशर व्यावसायिकांचा माफिया असा उल्लेखही केला. या पत्रातील भाषेमुळे संतापलेल्या आमदार शेळके यांनी बाळा भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. क्रशर व्यावसायिक शासकीय नियमांच्या अधीन राहूनच व्यवसाय करीत आहेत.
तसेच भेगडे दहा वर्ष आमदार होते. त्यावेळी कोणी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यांना आढळले नाही का? राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर हे व्यावसायिक अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचा दृष्टांत भेगडे यांना कसा काय झाला? स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याकरिता व राजकीय हव्यासापोटी क्रशर व्यावसायिकांना “माफिया” हा शब्द वापरणे योग्य नाही. क्रशर व्यावसायिक माफिया नसून कायदेशीरपणे शासकीय नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करणारे स्थानिकच आहेत. करोडो रुपयांचे कर्ज घेऊन पुणे जिल्ह्यात क्रशर व्यवसाय करणारे स्थानिक भूमिपुत्र असुन गुन्हेगार नाहीत, याचे भान बाळा भेगडे यांना असायला हवे, असा पलटवार शेळके यांनी केला. आमदार शेळके यांच्या या पत्रानंतर भेगडे यांनीही पुन्हा उत्तर दिले आहे. आमदारांनी उपस्थित केलेल्या भुमिपुत्रांबाबतच्या आस्थेबद्दल मला खुप आश्चर्य वाटत आहे. स्थानिक भूमिपुत्रांविषयीची तळमळ गेली अडीच वर्ष कुठे होती, असे उत्तर दिले.
भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्याशी माजी आमदार भेगडे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. असे असताना भेगडे यांना स्वतःच्या जिवाला धोका वाटत असेल तर राज्य सरकार आणि गृहखात्याचे हे अपयश आहे. वास्तविकता भेगडे यांनी आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून राज्य सरकारकडून मावळ तालुक्यासाठी नवीन विकास कामे कशी आणता येतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी असेच “लेटरवॉर’ या आजी-माजी आमदारांमध्ये रंगले होते. आता पुन्हा त्याचप्रमाणे “लेटरवॉर” करून काहीही साध्य होणार नाही. मावळच्या भूमिला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी मावळचा सर्वांगिण विकासासाठी आप-आपल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि तसे केले तरच जनतेच्या मनात आजी-माजी आमदार राहतील. अन्यथा जनता जनार्दन सुज्ञ आहे…





