बोरखळच्या विद्यालयामध्ये वॉटर फिल्टर प्लांटचा प्रारंभ

शिवथर – विक्रम एज्युकेशन सोसायटी संचलित बोरखळच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या ‘वॉटर कुलर व फिल्टर’ प्लांटचे उद्घाटन कूपर कंपनीचे व्यवस्थापक नितीन देशपांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धनवडे उपस्थित होते.
नितीन देशपांडे म्हणाले, जे विद्यार्थी आपल्या मातापित्यांचा आणि गुरूंचा आदर करतात त्यांना नेहमीच यश प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन उच्चपदस्थ अधिकारी बनून आपल्या मातापित्यांचे नाव, विद्यालयाचे नाव मोठे करावे. पुढील काही दिवसांत विद्यालयाचे सर्व वर्ग डीजिटल करण्यासंदर्भात कूपर उद्योग समूह प्रयत्नशील राहणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस पुढील शिक्षणास कूपर कार्पोरेशन समूहामार्फत आर्थिक सहाय्य म्हणून शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचे शाळाप्रमुख अंकुश नावडकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत धनवडे यांनी देशपांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील उपक्रमांबद्दल आजी- माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नितीन देशपांडे यांच्या हस्ते शिक्षक, सेवक वर्ग, कूपर समूहातील कर्मचारी व विद्यालयाचे माजी विद्यार्थी अनिकेत रसाळ, संदीप पाटील, फिरोज सय्यद, किरण पाटील, नारायण दीक्षित, अमोल रसाळ यांचा सत्कार करण्यात आला. विभा रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन अंकुश गायकवाड व छाया क्षीरसागर यांनी केले. महंमद शेख यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांकडून देशपांडे यांना दिली स्वतः बनविलेली भेटकार्डे
कूपर कार्पोरेशन समूहाचे अधिकारी नितीन देशपांडे यांच्या वाढदिवसादिवशी विद्यालयास मिळालेल्या वॉटर कुलरचा शुभारंभ हा जणू दुग्धशर्करा योगच…एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा वाढदिवस आपल्या विद्यालयात पहिल्यांदाच झाल्यामुळे विद्यार्थी भारावून गेले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली भेटकार्ड शुभेच्छा म्हणून दिली.





