नगर -जिल्ह्यात पारंपारिक पदवी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. परंतु रोजगारभिमुख व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये पदवी परिक्षा असणारा अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचा व्यावसायिक शिक्षणाकडे असणारा वाढता कल लक्षात घेता आय.एम.एस. ने पदवी परिक्षा क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरविले, त्यानुसार “बॅचलर ऑफ व्होकेशन’ अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी सांगितले. भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या आय.एम.एस. येथे पदवी परिक्षा अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता मिळाली असुन, त्या अंतर्गत बॅचलर ऑफ व्होकेशन ह्या अभ्यासक्रमाची सुरुवात शैक्षणिक वर्ष 2020 – 21 पासुन करण्यात येत आहे. संपूर्णत: रोजगाराभिमुख असणाऱ्या अशा या अभ्यासक्रमा अंतर्गत सन 2020 – 21 पासून बॅचलर इन बॅंकिंग ऍण्ड फायनान्स’ आणि बॅचलर इन ट्रॅव्हल अँड टूरिझम’ ह्या दोन पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. पूर्णत: व्यावसायिक शिक्षण 60 टक्के प्रॅकटीकल व 40 टक्के थिअरी अशा स्वरूपाचे हे अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांना आँल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई.) ह्यांची मान्यता असून अभ्यासक्रम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलग्नित असे अभ्यासक्रम आहेत. विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना व्यावसायिक शिक्षण देऊन, रोजगाराच्या विशेष संधी प्राप्त करता येईल. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इयत्ता 12 वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान) विद्यार्थी प्रवेशास पात्र आहे. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रवेश परिक्षेची गरज नाही. हा पदवी अभ्यासक्रम एकूण 6 सेमिस्टर चा असून प्रत्येक वर्षी 2 सेमिस्टर असतील. यावेळी डॉ.विक्रम बार्नबस म्हणाले की, अभ्यासक्रमाचा मुळ उद्देश हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे शिक्षण देणे असून ज्या योगे पदवी स्तरावर विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण रोजगाराच्या संधी प्राप्त करता येऊ शकतात. त्याअनुषंगाने प्रॅकटीकल शिक्षणावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे.