दिलासादायक! देशातील बेरोजगारीचा दर घटतोय

कोलकाता – अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने देशातील बेरोजगारीचा दर कमी होताना दिसत आहे असे सीएमआयईच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या मासिक टाइम सीरीज डेटा मध्ये ही बाब समोर आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये भारतातील एकूण बेरोजगारीचा दर 8.10 टक्के होता, हा दर मार्चमध्ये 7.6 टक्क्यांवर आला आहे.
बेरोजगारीच्या प्रमाणात काहीं प्रमाणात घट होत असलेली दिसत असली तर सध्याचा 7.6 टक्के हा दरही चिंताजनकच मानला जातो.
2 एप्रिल रोजी, शहरी बेरोजगारीचा दर 8.5 टक्के आणि ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.1 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
भारतीय सांख्यिकी संस्थेतील अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक अभिरूप सरकार म्हणाले की, एकूण बेरोजगारीचा दर कमी होताना दिसत असला तरी भारतासारख्या “गरीब” देशासाठी अजूनही सध्याचा बेरोजगारीचा दर खूपच अधिक आहे. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे 26.7 टक्के इतका होता.
त्यानंतर राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी 25 टक्के, बिहारमध्ये 14.4 टक्के, त्रिपुरामध्ये 14.1 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 5.6 टक्के बेरोजगारीची नोंद झाली.एप्रिल 2021 मध्ये, एकूण बेरोजगारीचा दर 7.97 टक्के होता आणि गेल्या वर्षी मेमध्ये तो 11.84 टक्क्यांपर्यंत वाढला.मार्च 2022 मध्ये कर्नाटक आणि गुजरातमध्ये सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 1.8 टक्के इतका बेरोजगारीचा दर नोंदवला गेला आहे.





