सातारा – आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ दिवाळीनंतर कुडाळमध्ये मेळावा

सातारा – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून संपूर्ण जावळी तालुक्यात हजारो कोटींची विकासकामे मार्गी लागली आहेत. जावळी तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशिवाय पर्याय नाही. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजेंना जावली तालुक्यातून विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करणार, असा निर्धार ह.भ.प. सुहास गिरी आणि त्यांच्या पत्नी, जावली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. जयश्री गिरी यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गिरी दांपत्याने म्हटले आहे, गेल्या पाच वर्षात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यात कधीही झाली नाहीत एवढी विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रत्येक गावातील समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. जावली तालुक्याचे हित जोसपण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेच आमदार हवे आहेत आणि तेच आमदार होणार आहेत. संपूर्ण जावली तालुका आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी, माझी पत्नी आणि आमचा संपूर्ण जिल्हा परिषद गट आ. शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मतदान करून विजयी करण्यासाठी सज्ज आहोत.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ दिवाळीनंतर लगेच कुडाळ येथे भव्य मेळावा घेणार असून या मेळाव्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जावली तालुक्यातील महायुतीमधील विविध पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व आजी- माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे गिरी यांनी म्हटले आहे.





