Satara | आ. दीपक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

फलटण, (प्रतिनिधी ) – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ११ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आ. दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मोठे शक्ती प्रदर्शन करत शुक्रवारी महाविकास आघाडीतर्फे आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आ. दीपक चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहे.
फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन दीपक चव्हाण यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, सह्याद्री कदम, विकास नाळे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. दीपक चव्हाण हे यापूर्वी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आहेत. चौथ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ११ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले असल्याची माहीती निवङणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.




