“कॉम्बिंग’ पुणे; दीड हजार गुन्हेगारांची झाडाझडती

पुणे -गणपती विसर्जनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री 9 ते शनिवारी मध्यरात्री 2 या वेळेत “कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवले. यात 525 हॉटेल्स, लॉजेस, ढाबे, एसटी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयित व्यक्तींची झडती घेण्यात आली.यात 1,668 गुन्हेगारांना तपासण्यात आले व त्यापैकी 424 गुन्हेगार सापडल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
या झाडाझडतीत शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात 15 केसेस करण्यात आल्या. यात 13 कोयते, दोन तलवारी, एक पालघन जप्त करण्यात आली. सात तडीपार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली.
दरोड्याचे तयारीत असलेल्या तीन आरोपींना युनिट-6 ने जेरबंद करत त्यांच्याकडून कारसह दरोड्यातील चार लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. खंडणीविरोधी पथकाने फरासखाना हद्दीतील “मोक्का’तील आरोपी मेहराज शेख यास अटक केली. अंमली पदार्थविरोधी पथकाने सहा केसेसमध्ये 24 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. तर, एका आरोपीस अटक करुन 101 लिटर गावठी दारू व एक टेम्पो असा तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.





