कोयनानगर – येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कोयना क्रिकेट असोसिएशनच्यावतीने भव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मैदान रोषणाईने उजळले असून, खेळाडू आणि प्रेक्षकांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर थाटात न्हालेला आहे. स्थानिक तरुणाईमध्ये या स्पर्धेमुळे चांगलाच जोश संचारला आहे. मात्र, या झगमगाटाच्या आड काही गंभीर प्रश्नही उभे राहत आहेत. गेली अनेक वर्षे कोयना क्रिकेट असोसिएशन सामन्यांचे आयोजन करत आहे, पण अद्यापही या भागातील एखादा खेळाडू राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर झळकलेला नाही. त्यामुळे “खेळात रंग आहे, पण भविष्यात काळोख का?” असा प्रश्न उपस्थित होतो. स्पर्धा दरम्यान समालोचनासाठी दरवर्षी मुंबई-पुणे येथून मान्यवर बोलावले जातात. लाखो रुपयांचा खर्च केला जातो. पण इतक्या वर्षांत कोयनानगर परिसरातून एकही दमदार समालोचक घडलेला नाही, ही बाब अधिक वेदनादायक आहे. यावरून स्पष्ट होते की, स्थानिक पातळीवर प्रतिभेला घडवण्यासाठी प्रयत्नच झालेले नाहीत. फक्त सामने भरवणे, बक्षिसे वाटणे आणि उत्साहात रंगून जाणे पुरेसे नाही. जर कोयना परिसरातील तरुणांना खऱ्या अर्थाने संधी द्यायची असेल, तर प्रशिक्षण शिबिरे, कौशल्यविकास कार्यक्रम आणि रोजगाराभिमुख उपक्रम सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. खेळ उभा राहिला आहे, पण प्रतिभेला उडायला पंख मिळाले पाहिजेत. अन्यथा, रोषणाईचे झगमगाट संपल्यावर तरुणांचे आयुष्य पुन्हा अंधारातच राहणार आहे याची तमा कुणालाच नाही.