अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांची पाटणला धाव

अरुण पवार
पाटण – पावसाचे घर ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यात याही वर्षी अतिवृष्टीचा तडाखा बसला अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती येण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी तातडीने गुरुवारी पाटणकडे धाव घेत आपत्ती बाधित ठिकाणांची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यामुळे पाटणची आपत्ती निवारण यंत्रणा अलर्ट झाली असून पाटणचे प्रांताधिकारीही बुधवारी रातोरात कोयना भागातील चाफेर व भागात ऑन द स्पॉट दिसले. पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून काही अंशी कमी झाला असला तरी जुलै महिना संपेपर्यंत अतीवृष्टी आणि महापूराचे संकट पाटण तालुक्यावर कायम आहे.
सुदैवाने आज अखेर अतिवृष्टी किंवा महापुरामुळे तालुक्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथे वस्तीवर दरड कोसळून 60 ते 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पाटण तालुक्यावर अतिवृष्टीचे संकट कायम आहे. पाटण तालुक्यात या हंगामातील पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे जलमय परिस्थिती अद्याप तरी निर्माण झालेली नाही. मात्र, सततचा पाऊस पडून डोंगर खचणे, दरडी कोसळणे आदी. घटना पुढील दिवसात होण्याच शक्यता नाकारता येत नाही.
अधिकारी अलर्ट, कर्मचारी जुमानेनात
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवार, गुरुवारी दोनवेळा पाटणला धाव घेतली. तालुक्यातील आपत्ती परिस्थितीची पाहणी करून माहिती घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्तीच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. मात्र, वरिष्ठांसमोर केवळ तत्परता दाखवायची आणि विशेष करून रात्रीच्या वेळी झोपा काढायच्या. वरिष्ठांचे आदेश असूनही शासकीय मुख्यालय किंवा नियुक्तीच्या ठिकाणी मुक्काम करायचा नाही, असे अनेक तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी आढळून येतात. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारावा, अशी मागणी होत आहे.
पाटणला पावसाचा जोर ओसरला
गुरुवार, दि. 20 रोजी सकाळपासून पाटण तालुक्यात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही प्रमाणात पाटणची पुरपरिस्थिती निवळली आहे. कोयना नदीवरील मुळगाव पूल वाहतूकीसाठी खुला झाला आहे. मात्र, जोरदार पावसामुळे तालुक्यातील रस्ते उखडले आहेत.





