Collector Santosh Patil: तृतीयपंथीयांना लाभ मिळण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा; जिल्हाधिकारी संतोष पाटील
Collector Santosh Patil: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अलंकार हॉलमध्ये जिल्हास्तरीय सक्षमीकरण शिबिर संपन्न; शासकीय योजनांची एकाच छताखाली माहिती

Collector Santosh Patil – संविधानाने सर्व नागरिकांना दिलेल्या समान हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, तृतीयपंथीय घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेसाठी सर्व शासकीय विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सहायक आयुक्त,
समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने अलंकार हॉलमध्ये जिल्हास्तरीय तृतीयपंथीय व्यक्ती सक्षमीकरण शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरास अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तृतीयपंथी उपस्थित होते. या शिबिरामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
या स्टॉलच्या माध्यमातून तृतीयपंथीयांनी योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले. तृतीयपंथीय व्यक्तींवरील हिंसाचार, भेदभावाविरोधातील कायदेशीर संरक्षण आणि तक्रार निवारण यंत्रणेबाबत सविस्तर माहिती वैशाली कडुकर यांनी दिली. तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे आणि ‘तृतीयपंथीय धोरण-२०२४’ सह केंद्र शासनाच्या २०१९ च्या अधिनियमानुसार विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देणे हे या आयोजनाचे प्रमुख ध्येय असल्याचे सुनील जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तृतीयपंथीय बांधवांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती उपलब्ध झाली. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, कौशल्य विकास व रोजगार विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कामगार कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र या विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिधापत्रिका, ई- श्रम कार्ड, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, कायदेशीर हक्क आणि विविध कर्ज-कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. मिलिंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



