‘जगभरातील शिवकालीन वस्तूंचे संकलन करणार..’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

रायगड – स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या रायगड किल्य्यावर शुक्रवार (दि. 3 जून) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिनाचा सोहळा अगदी शाही पद्धतीने पार पडला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा केली आहे.
राज्य शासन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरमध्ये शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. तसेच किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येणार आहे.
महाराजांनी वापरलेली वाघनखे व जगदंबा तलवार परत आणण्याचा प्रयत्न करणार…
‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे आणि जगदंबा तलवार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार वाघनखे दर्शनासाठी देण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सेनापतींवर आधारित टपाल तिकिटांचे प्रकाशन या कालावधीत व्हावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यभर ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग सादर केले जाणार आहे’. अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे





