प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरात थंडीचा जोर कायम होता. बहुतांश परिसरातील किमान तापमान १० अंशाच्या खाली नोंदविले गेले. तर पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून, दि. २२ नोव्हेंबरनंतर शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होईल. तर ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाच्या अति हलक्या सरींची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शहरासह जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून किमान तापमानात झपाट्याने घट झाली आणि हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले असून, गेल्या २४ तासात हवेली आणि माळीण परिसरातील किमान तापमानात फारसा बदल झालेला नाही. हवेली येथील किमान तापमानात अर्धा अंशाने वाढ झाली असली तरी थंडीचा जोर कायम आहे. तर शहरासह जिल्ह्यातील अन्य भागातील किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाल्यामुळे १० ते ११ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान आज ९ अंशाच्या खाली नोंदविले. त्यामुळे दुपारी ऊन असले तरी हवेत गारवा जाणवत होता. तसेच रात्रीही थंडीचा जोर वाढला होता.दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात थंडीचा जोर कायम राहील. त्यानंतर किमान तापमानात काही अंशी वाढ होणार असून, दिवसभर आकाश निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. तिसऱ्या व चौथ्या दिवशी शहरातील तुरळक काही पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहर परिसरातील किमान तापमान आज हवेली परिसरात सर्वात कमी ७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ माळीण येथे ९, पाषाण येथील ९.३, आंबेगांव परिसरात ९.४, शिवाजीनगर आणि बारामती येथे ९.५, तळेगांव ९.६, दौंड ९.९, गिरीवन १२.८, भोरमध्ये १३, कोरेगांव पार्क येथे १४, चिंचवड परिसरात १४.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.