महायुतीतील शीतयुद्ध दिल्ली दरबारी: एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे व्यक्त केली नाराजी

मुंबई: महायुती आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत असतात. विरोधकही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा वारंवार करतात. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे. दुसरीकडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून पुरेसा निधी मिळत नसल्याची तसेच फायली अडवल्या जात असल्याची थेट नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहा यांची भेट घेऊन आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. या बैठकीत त्यांनी शिवसेना आमदारांना निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची तक्रारही केल्याचे समजते. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव आता थेट दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचे दिसते.
काल पुण्यात झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी निधी वाटपाबाबत खंत व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फायली प्रलंबित ठेवल्या जात असल्याचे शिंदे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या विकासकामांना अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. “महायुतीत असाल तर निधी वाटप आणि फाइल मंजुरीत समानता हवी,” अशी मागणी शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली.
दोन दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अर्थ खात्याने अपुरा निधी दिल्याने ही समस्या उद्भवली होती. अखेरीस एकनाथ शिंदे यांना स्वतः वित्त सचिवांना फोन करून मध्यस्थी करावी लागली. या घटनेने महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कुरघोडी उघड झाली. आता शिंदे यांनी थेट अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याने हा वाद अधिक तीव्र झाला आहे.
दरम्यान, अमित शहा रायगड दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शहा यांचे कौतुक करताना म्हटले, “मोदी सरकारने कलम 370 हटवले, वक्फ बोर्ड विधेयकावरील शहा यांचे भाषण अंगावर शहारे आणणारे होते. सीमेवरील शत्रू बिळात बसले आहेत, हे शहा आणि मोदीजींमुळे. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करणे आणि 26/11 चा मास्टरमाइंड राणाला दिल्लीत किंवा मुंबईत आणून त्याला कठोर शिक्षेपर्यंत नेले जात आहे, ही कामगिरी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची आहे.” शिंदे यांनी एका शेरातून शहा यांचे कौतुकही केले.





