राज्यात पुन्हा थंडीची ! लाट उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ गारठणार

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून थंडी वाढली असून मुंबईसारख्या शहरांमध्येही थंडी जाणवत आहे. तसेच राज्यातील ग्रामीण भागात अक्षरशः कहरच केला आहे. आता हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज (रविवार) किमान तापमान हे 10 अंशांखाली गेले असून जळगावात 5 अंश सेल्सिअस आणि नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंद करण्यात आले आहे.
तसेच पुढील 24 तासांमध्ये या ठिकाणच्या किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होणार आहे. यामुळे रात्री किंवा पहाटेच नव्हे, तर दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याची माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज ही वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.





