Coffee with the Chairman: ‘कॉफी विथ अध्यक्ष, सीईओ’तून शिक्षकांचे कौतुकास्पद!
Coffee with the Chairman:

झेडपीकडून गुणवंत शिक्षकांसाठी १२ लाखांची पारितोषिके जाहीर
Coffee with the Chairman: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत पुणे जिल्हा परिषदेने एक नवा पायंडा पाडला आहे.
जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित कॉफी विथ अध्यक्ष, सीईओ व उपाध्यक्ष या विशेष संवादात्मक कार्यक्रमात गुणवंत शिक्षकांचा व मार्गदर्शक अधिकाऱ्यांचा दिमाखात गौरव करण्यात आला. याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट निकाल लावणाऱ्या शिक्षकांसाठी तब्बल १२ लाख रुपयांच्या भरघोस पारितोषिकांची घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमात २०२४-२५ मधील ५८ आणि २०२५-२६ मधील १५१ अशा एकूण २०९ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. ज्यांच्या ५ किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा शिष्यवृत्ती यादीत स्थान मिळवले आहे.
यासोबतच विनोबा ॲपवरील टॉप ऑफ द मंथ उपक्रमातील ३४ शिक्षक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून परकीय भाषा शिक्षणक्रमात यश मिळवणारे ४ शिक्षक आणि ७ केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
शिक्षकांच्या या कौतुकास्पद कामगिरीला पाठबळ देताना जिल्हा परिषदेने १२ लाखांची बक्षीस योजना जाहीर केली. यामध्ये गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी आणणाऱ्या पहिल्या १२ शिक्षकांना प्रत्येकी १ लाख रुपये, तर प्रत्येक तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण करणाऱ्या एका शिक्षकास ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
शिक्षकांशी थेट संवाद साधताना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी नावीन्यपूर्ण अध्यापनावर भर देण्याचे आवाहन केले.
उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी प्रास्ताविक केले.





