आचारसंहीतेचा सराफांना फटका ! राज्यभरातील कारवायांमुळे व्यावसायीक त्रस्त

Businessmen | Jewellers – राज्यभरात सुरू असलेल्या भरारी पथकांच्या कारवाईत सोने आणि चांदीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात पकडल्या जात आहेत. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही कारवाई आचारसंहीता असल्याने केली जात आहे.
नोंदणीकृत सराफा व्यापाऱ्यांना ज्यांच्या राज्यभरात अनेक शाखा आहेत, अशा व्यापाऱ्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात सोन्या-चांदीची वाहतूक करण्याची मुभा दिलेली आहे. त्यासाठी इन्व्हाईस किंवा जीएसटीची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार केलेली चलने वैध मानली जातात. पण असे असतानाही कारवाई केली जात आहे.
याविषयीची कल्पना शहरा- शहराच्या वेशीवर सध्या तैनात असणाऱ्या भरारी पथकांमधील पोलीस आणि इतर महसूल कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे अनेकदा विशेषतः सोन्या-चांदीच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक कंपन्यांच्या गाड्या पकडल्या जातात. त्यातून अवैध वाहतूक होत असल्याचा प्रथमदर्शनी भास निर्माण केला जातो.
पण जर लॉजिस्टिक कंपन्या अशाप्रकारे सुरक्षित वाहतूक यंत्रणा पुरवतात अशांच्या वाहनांमधून सोने चांदी पकडली गेल्यास, तो आचारसंहिता भंग असल्याची माहिती पुरवणे हे चुकीचे आहे. तशा बातम्या सध्या पसरवल्या जात आहे, असा सराफा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.





