स्वारगेट-कात्रज मेट्रोचा नारळ लोकसभेपूर्वी?

पुणे – सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या मेट्रोच्या पाच किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च 2024 अखेर हा मार्ग सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. त्यातच स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित मार्गही मान्यतेच्या फास्ट ट्रॅकवर आहे. महामेट्रोने या मार्गासाठी तयार केलेला आराखडा राज्यशासनाने मंजूर करून तो केंद्राशासनास पाठविण्यात आला आहे.
केंद्राने पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डासमोर (पीआयबी) हा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला मान्यता मिळण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणास हिरवा कंदील मिळून कामासही सुरूवात केली जाण्याची शक्यता आहे.
महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांचे काम सुरू आहे. तर, 2018 पासून मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट हा मार्ग सुरू झाला आहे. तर वनाज ते रामवाडी या मार्गातील वनाज ते रूबी हॉलपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे.
त्यातच निगडीपर्यंत विस्ताराचे काम सुरू होणार असून, लगेचच महामेट्रो स्वारगेट-कात्रजचेही काम हाती घेणार आहे. मात्र, कात्रजपर्यंत जवळपास सर्वच बोगदा असल्याने या कामास काही वेळ जाणार आहे.
असा असेल मार्ग
- अंतर – 5.5 किलोमीटर
- खर्च – 3 हजार 668 कोटी रु.
- मार्ग पूर्णत : भुयारी मार्ग
- स्थानके – मार्केटयार्ड, पद्मावती, कात्रज
- महापालिकेचा हिस्सा
655 कोटी रु. - राज्यशासन देणार
891 कोटी रु. - 300 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करणार
- 1800 कोटी रुपयांचे कर्ज उभारणार
“पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो मार्ग विस्तारासोबतच स्वारगेट ते कात्रज मार्गाचा विस्तारही अंतिम टप्प्यात आहे. केंद्राच्या “पीआयबी’समोर हा प्रस्ताव असून त्यांनी उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता केली जात आहे. या सर्व प्रक्रियेस दोन महिन्यांचा कालावधी जाईल, अशी अपेक्षा आहे.”- डॉ. श्रावण हर्डीकर, संचालक, महामेट्रो





