CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून उद्यापासून ‘स्कूल ठीक करो’ अभियान; हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून हिंगोलीत ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला सुरुवात होणार आहे. अभिजीत दीपके यांच्या संतुक पिंपरी गावातून अभियानाचा प्रारंभ होईल.

CJP : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) उद्यापासून ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करणार आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावातून या अभियानाची सुरुवात होणार आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सकाळी साडेसात वाजता अभियानाचा प्रारंभ होईल.
दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दीपके यांनी सांगितले की, आपल्या गावातील स्थानिक सरकारी शाळेची दुरुस्ती करण्यासाठी सरपंचांना विनंती करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याचीही पाहणी केली जाणार आहे.
या अभियानासाठी सीजेपीने अनेक पथके तयार केली आहेत. ही पथके विविध गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ आणि सरपंचांशी संवाद साधणार असून, सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करणार आहेत. शाळांच्या सुधारणेचे काम सर्वांच्या सहभागातून व्हावे, हा अभियानामागील उद्देश असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या तिरंगा यात्रा रॅलीबाबत विचारले असता दीपके म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अशा रॅली होणे योग्य आहे; मात्र त्यासोबत शिक्षणाच्या प्रश्नांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुली शाळेत जाण्यासाठी सात किलोमीटरपर्यंत पायी चालत असल्याचे आणि काही ठिकाणी शाळेकडे जाण्यासाठी रस्ताही नसल्याचे व्हिडिओ समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, दीपके यांनी यापूर्वी संबंधित गावांतील सरपंचांना सरकारी शाळांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. ग्रामस्थांनीही आपल्या मुलांच्या शाळांना भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करावी आणि काही कमतरता आढळल्यास सीजेपीला कळवावे, असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दीपके यांनी, स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असतानाही ग्रामीण भागातील मुलांना शाळांमधील मूलभूत सुविधांसाठी विनवणी करावी लागू नये, अशी भूमिका मांडली. ग्रामीण विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा देण्यात देश म्हणून आपण अपयशी ठरलो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.





