Cockroach Janata Party : सोशल मिडियावर ‘मीम’ ते जंतर-मंतरवर ‘महासंग्राम’; ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या उदयापासून ते आंदोलनापर्यंतचा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट
Cockroach Janata Party protest : हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन अभिजीत दीपके दिल्ली विमानतळावर...

Cockroach Janata Party : सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)चे पहिले मोठं आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरू झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व (CJP)चे संस्थापक अभिजित दिपके करणार आहे. याकरिता अभिजित दिपके शनिवारी सकाळी ७:४५ वाजता अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झाला आहे. मात्र हे आंदोलन सुरू करण्यापूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
खरं सांगायचं झालं तर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा अधिकृत पक्ष नाही. मात्र काहींनी या पक्षाची धास्ती घेतल्याची चर्चा सुरू आहे. अनेक नेतेमंडळींनी या पक्षाला मोठा विरोध केला आहे, तर अनेकांनी याला मोठा पाठिंबा दर्शवत या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. चला तर मग आजच्या या Speical Report मधून ‘कॉकरोच जनता पार्टी’चा उदय ते थेट दिल्लीत जंतर-मंतर मैदानावरील आंदोलन याबद्दलचा संपूर्ण आढावा घेऊयात…
न्यायमूर्ती सुर्यकांत यांचे विधान अन् कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात (Cockroach Janata Party)
तर भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळांची उपमा दिली होती. एका सुनावणीदरम्यान ते म्हणाले की, देशातील काही तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यामुळे मग ते सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करत फिरतात. पण त्यांचं हे वक्तव्य देशातील तरुणांना काही आवडलं नाही.
परिणामी प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेत असलेला आणि मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरचा मूळचा असलेला 30 वर्षीय अभिजीत दिपकेने थेट झुरळाच्याच नावानं राजकीय पक्ष स्थापन केला आणि या पक्षाला ‘कॉकरोच जनता पार्टी’ असं नाव देण्यात आलं.
खरं तर सुरुवातीला हा निव्वळ एक उपरोधिक टोला आहे असं समजून कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. सुरुवातीला, हे फक्त एक मीम पेज होते, पण लवकरच ते बेरोजगारी, पेपरफुटी, तरुणांचा संताप आणि व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारी एक ऑनलाइन मोहीम बनली. स्वतःला तरुणांचा पक्ष म्हणवणाऱ्या या पेजने अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळवले आहेत आणि ते इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल झालं आहे.
कॉकरोच जनता पार्टीने अगदी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला देखील फॉलोअर्सच्या संख्येत मागे टाकले. सोशल मिडियावर कॉकरोच जनता पार्टीला मिळालेली लोकप्रियता पाहता भारतात या पार्टीचे ‘एक्स’ खाते भारतात बॅन करण्यात आले आहे. यानंतर अभिजीत दिपकेसह त्याच्या समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र त्यानंतर काही वेळातच ‘कॉकरोच इज बॅक’ या नावाने ‘एक्स’ खाते उघडण्यात आले. ज्याला तरुणांचा पुन्हा मोठा प्रतिसाद मिळाला.
ते तीन प्रवक्ते कोण ? (Cockroach Janata Party )
सुरुवातीपासून कॉकरोच जनता पार्टीने देशातील परीक्षांमधील गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी व्हिडीओद्वारे अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात येणार असल्याचे जाहीर केले. इतकेच काय तर अटक होण्याची भीतीही वर्तवली.
मात्र त्याचे भारतात येण्यापूर्वी या पार्टीची एक पत्रकार परिषद देखील दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. ज्यात तुम्हाला 3 तरुण पत्रकरांच्या प्रश्नांची उत्तरे देतेना दिसले असतील. हे तरुण नेमके कोण आहेत, यावर देखील प्रचंड चर्चा रंगली होती. तर कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास (मुख्य प्रवक्ता), विजेता दहिया आणि आशुतोष रांका हे तीन प्रवक्ते आहेत.
सौरव दास हे एक शोध पत्रकार आहेत ज्यांना कायदेशीर, कायदेविषयक आणि सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. तर विजेता दहिया या एक राजकीय अभ्यासक, कंटेंट क्रिएटर आणि चित्रपट निर्माते आहेतय. त्यांनी ‘पॉवर ऑफ युनिव्हर्स’ आणि ‘टू हेल विथ दॅट जॉब’ ही दोन सर्वाधिक खप असलेली पुस्तके लिहिली आहेत. आशुतोष हे आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी लंडनमधील प्रसिद्ध मॅकिन्से अँड कंपनीमध्ये धोरणात्मक व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे. भारतात परतल्यावर त्यांनी जयपूरमध्ये पर्यावरण, शिक्षण आणि तरुणांशी निगडित अनेक जनआंदोलनांचे नेतृत्व केले.
आंदोलन नेमकं कशासाठी? (Cockroach Janata Party)
‘नीट’च्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, या पार्श्वभूमीवर ‘सीजेपी’ने आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या पक्षाने केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे आज, शनिवारी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी कॉक्रोच जनता पार्टीने शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ‘हे आंदोलन नियमांचा भंग न करता शांततेने करायचे आहे. प्रत्येक आंदोलकाने सोबत येताना राष्ट्रध्वज आणि एक पुस्तक सोबत आणावे. तसेच आंदोलनासाठी एकटे न येता आपल्या कुटुंबालाही सोबत आणावे’, असे आवाहन सीजेपीने केले.
अभिजीत दीपके यांनी आज दिल्ली जंतर-मंतरवर एका शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिलीय. विशेष म्हणजे हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन अभिजीत दीपके दिल्ली विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी माध्यमांचे कॅमेरे त्याच्यावर खिळलेले होते. त्याच्या या कृतीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
दिग्गज नेत्यांचा पाठिंबा
कॉकरोच जनता पार्टीला प्रख्यात पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची मोठी साथ मिळाली आहे. जर 5 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर 6 जून रोजी सीजेपीने (CJP) आयोजित केलेल्या शांततापूर्ण आंदोलनात आपण सहभागी होऊ, असा इशारा वांगचुक यांनी दिला आहे. तर पुण्यातील वकील अॅड. असीम सरोदे यांनीही कॉकरोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन. अहिंसक व लोकशाही मार्ग सोडू नका. आंदोलनात घुसखोरी करणाऱ्यांपासून सावध रहा, असे आवाहनही असीम सरोदे यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही दिल्लीला या आंदोलनासाठी रवाना झाल्या आहेत. त्याबद्दल ट्वीट करत त्यांनी माहिती दिली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, कोचिंग क्लासशी संबंधित नागरिक दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी दिल्ली जिल्ह्याची 12 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संसद मार्ग, जंतरमंतर आणि संवेदनशील भागात 2,000 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कडक पोलीस सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
आजच्या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. कॉकरोच जनता पार्टी ही डिजिटल माध्यमातून उदयास आलेली चळवळ असून अल्पावधीतच तिने मोठ्या प्रमाणात तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. या आंदोलनाला विविध स्तरातून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि आता थेट आंदोलनापर्यंतची भूमिका यावरून आता कॉकरोच जनता पार्टीचे पुढील राजकीय परिणाम याबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा:







