सूपमध्ये सापडलं झुरळ ! ‘भिवंडी दरबार’ हॉटेलचा घाणेरडा कारनामा; मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

पुणे : हाॅटेलमध्ये कुटुंबासह जेवण करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वानवडी भागातील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून संबंधित हाॅटेलचे मालक, तसेच व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अश्विनी रवी शिससाट (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘भिवंडी दरबार’ हाॅटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाट कुटुंबीय हे गेल्या महिन्यात १६ जून रोजी वानवडीतील ‘भिवंडी दरबार हाॅटेल’मध्ये रात्री जेवण करण्यासाठी गेले होते. त्यंनी जेवण मागविले. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप देण्यात आले. तेव्हा शिरसाट यांना दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळले.
या घटनेनंतर शिरसाट यांनी हाॅटेल व्यवस्थापकासह कामगारांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सारवासारव केली. हाॅटेल व्यवस्थापकाने भटारखान्यातील स्वच्छतेची कोणतीही दक्षता घेतली नाही, तसेच ग्राहकांच्या आरोग्याला हानी होईल, असे खाद्यपदार्थ दिल्याचे शिसराट यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २७५ अन्वये (ग्राहकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत





