भयनाक! जगप्रसिद्ध पर्यटन स्थळी इस्रायलच्या महिलेवर सामुहिक बलात्कार, इतरांना तलावात फेकले

Karnataka Hampi Gang Rape Case | एकीकडे जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात असताना, कर्नाटकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हम्पी येथे परदेशी महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
हम्पी येथे एका 27 वर्षीय इस्रायली महिला पर्यटक आणि होमस्टे चालवणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही महिला सानापूर तलावाच्या काठावर गप्पा मारत होत्या. त्यांच्यासोबत इतर पुरुष पर्यटक देखील होते. यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालत सामूहिक बलात्कार केला.
रिपोर्टनुसार, इस्रायली महिला पर्यटक व एक महिला सानापूर तलावाजवळ रात्रीच्या वेळी गाणी ऐकत बसले होते. त्यांच्यासोबत, एक अमेरिकन नागरिक व दोन भारतीय नागरिक होते. त्यावेळी बाईकवर तेथे आलेल्या तीन अज्ञात लोकांनी त्यांच्याशी वाद घातला. या आरोपींनी आधी पेट्रोल मागितले, त्यानंतर इस्रायली पर्यटकाकडून 100 रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपींनी महिलांशी गैरवर्तन केले. तसेच, पुरुष पर्यटकांना मारहाण करत तलावात ढकलून दिले व ते फरार झाले. तलावात ढकलण्यात आलेल्या पुरुष पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर होमस्टे चालणाऱ्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 पथकं नेमली आहेत. या घटनेतील पीडित महिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.





