गडकरींच्या पत्रावर मुख्यामंत्री ठाकरे म्हणाले, “नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण…”

Uddhav Thackeray’s reply to Gadkari letter – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं होत. या पत्राद्वारे गडकरी यांनी, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून रस्तेबांधणी कार्यात अडथळा आणण्यात येत असल्याचा आरोप केला होता. गडकरींच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच गडकरींच्या ‘त्या’ पत्रावर भाष्य केलं आहे.
नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण…
“नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण पत्र कठोर लिहिता. तुमचं आणि आमचं नातं थोडं वेगळं आहे. तुम्हीही कर्तव्यकठोर आहात, आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. आपल्याला कल्पना आहे की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे, ती आपणही घेतली आहे की जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. त्यांचा विश्वासघात करायचा नाही. जनतेच्या कामात अडथळा येऊ द्यायचा नाही .” नागपूर मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
याबाबत पुढे बोलताना ठाकरे यांनी, “मी तुमच्या पत्राचा हलका-फुलका उल्लेख जरी केला असला, तरी मी तुम्हाला ग्वाही देतो, की कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही.” अशी ग्वाही देखील दिली.
नितीन गडकरींच्या पत्रातील आरोप । Nitin Gadkari letter to CM Uddhav Thackeray
पत्राद्वारे गडकरी यांनी, अकोला, नांदेड, वाशिम, उस्मानाबाद या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, यात शिवसैनिक अडथळे आणत आहेत. कंत्राटदारांना धमक्या देत आहेत, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
तसेच, मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचं काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळं कंत्राटदाराने काम थांबवण्याची परवानगी मागितली आहे, असे देखील गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे.





