Madhya Pradesh Election Result 2023 Live Updates : मध्य प्रदेशात ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्ष आघाडीवर दिसत आहे. अनेक ठिकाणी भाजप पक्षाने जल्लोषही सुरू केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही भाजपच्या आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मध्य प्रदेशच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि नरेंद्र मोदींच्या मनात मध्य प्रदेश आहे. शिवराज म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आणि निवडणूक प्रचाराचा परिणाम म्हणजे भाजपला अशी आघाडी मिळत असल्याचे दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासोबतच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बेहन योजनेमुळे हे चित्र पहायला मिळत असल्याचे म्हटले आहे . शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले की, लाडली बेहन योजनेने आपले काम केले आहे आणि त्याचाच परिणाम समोर येत आहे.
ट्रेंडनुसार भाजप 156 जागांवर आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत सीएम शिवराज म्हणतात की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीसंदर्भात रणनीती बनवण्याचे काम केले होते आणि कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे, ज्याचा परिणाम ट्रेंडमध्ये दिसून येत आहे.
उल्लेखनीय आहे की, 25 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील 230 विधानसभा जागांवर मतदान झाले होते. मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. मध्य प्रदेशात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. यावेळी राज्यातील 230 जागांवर 76.62 टक्के मतदान झाले असून, हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
दरम्यान, 2018 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2018 मध्ये काँग्रेसने राज्यात 114 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. 2018 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसने सरकार स्थापन केले. मात्र, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ यांचे सरकार पडले.