मुख्यमंत्री फडणवीसांकडून पावसाचा आढावा: मराठवाड्यात 800 गावे बाधित, कोकण-विदर्भात रेड अलर्ट

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा कंट्रोल रूममधून आढावा घेतला. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, राज्यात 4 लाख हेक्टर शेती पावसामुळे बाधित झाली आहे. यवतमाळ, नांदेड, वर्धा, बीड आणि वाशीम येथे सर्वाधिक नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त भागात उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मोठी हानी झाली आहे. 18 ते 21 ऑगस्टदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज असून, 15-16 जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. कोकणातील जगबुडी, अंबा, पुंडलिका आणि वसिष्ठी नद्यांची पाणी पातळी इशारा स्तरावर आहे. चिपळूणमध्ये पूर टाळण्यासाठी वसिष्ठी नदीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
🔸CM Devendra Fadnavis chaired a detailed review of excessive rainfall in Maharashtra at Mantralaya Control Room, Mumbai.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय नियंत्रण कक्षात महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात सविस्तर बैठक.
🕑 2pm | 18-8-2025📍Mantralaya,… pic.twitter.com/jaQNp6VcY3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 18, 2025
मराठवाड्यात बीड, लातूर आणि नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. नांदेडच्या मुखेडमध्ये 206 मिमी पाऊस पडला, 5 जण बेपत्ता झाले, तर 150 हून अधिक जनावरे वाहून गेली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांनी 226 लोकांना सुरक्षित काढले. अमरावतीत 2 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
पुणे विभागात कोल्हापूर-सातारा घाटात रेड अलर्ट आहे, तर अलमाटी धरणाच्या पाण्यावर कर्नाटक सरकारशी समन्वय साधला जात आहे. मुंबईत 48 तासांत 200 मिमी पाऊस पडला, चेंबूरमध्ये सर्वाधिक 177 मिमी नोंदले गेले. रेल्वे वाहतूक मंदावली असली तरी सुरळीत आहे. समुद्रात 3-4 मीटर उंच लाटांची शक्यता असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.





