Devendra Fadnavis : शनिवारी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादांच्या निधानानंतर तिसऱ्याच दिवशी पार पडलेल्या शपथविधीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींनी टीका केली आहे. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. येत्या पाच फेब्रुवारीपर्यंत प्रचाराचा कालावधी असून ७ सात फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या सात दिवसांत फडणवीसांच्या २२ प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी प्रचार न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रचारसभा रद्द करण्यात आल्या असून, एकही सभा घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. शपथविधीसाठी इतकी घाई का करण्यात आली ? अशी विचारणा करण्यात आली. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे. दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे. असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोस्टमधून व्यक्त केला. हेही वाचा : Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनात दाखल ; अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींकडे सादर