Eknath Shinde : मोठी घडामोड..! एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार?
Eknath Shinde : राज्याच्या पावसाळी अधिवेशनानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला आहे.

Eknath Shinde : राज्याच्या पावसाळी अधिवेशनानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीस सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. (Eknath Shinde)
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळांवरील नियुक्त्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी असल्याची चर्चा असून, मंत्रिमंडळात खांदेपालट करून काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Eknath Shinde)
आज दिल्ली दौऱ्यावर शिंदे
बैठकीनंतर एकनाथ शिंदे एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार आहेत. अधिवेशनादरम्यान ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील राजकीय घडामोडी आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Eknath Shinde)
उद्धव ठाकरेंवर टीका
बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावरून त्यांनी निशाणा साधत, “तुम्ही लढा, आम्ही बाहेरून पाठिंबा देतो, अशी त्यांची भूमिका आहे,” असा टोला लगावला. (Eknath Shinde)
तसेच, सरकारविरोधातील प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देऊन अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर असल्याचे सांगत, केंद्र सरकारच्या विविध योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. (Eknath Shinde)
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी शिंदे यांच्या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. (Eknath Shinde)






