मुंबई – दादर, घाटकोपरसह मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या ढगाळ हवामानाचा फटका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील बसला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. त्यानंतर पालघरमध्ये हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. ही सभा होत नाही तोच मुंबईत अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. मुंबईत सोसाट्याचा वारा सुटून जोरदार पावसाला सुरुवात झाली. या खराब वातावरणाचा फटका या नेत्यांना बसला. अमित शहा आणि एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरद्वारे मुंबई विमानतळावर पोहोचणार होते. मात्र खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करून दोघेही रस्ते मार्गाने मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत.