इंदापूरात ढगफुटीसदृश पावसाचे थैमान; हर्षवर्धन पाटलांची नुकसानग्रस्तांना तात्काळ मदतीची मागणी

इंदापूर : इंदापूर तालुक्यात रविवारी झालेल्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसामुळे शेतपिके, फळबागा, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नीरा नदीला मोठा पूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागांचा तातडीने पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी केली.
पाटील म्हणाले की, भिगवण, सणसर, जांब, कुरवली, चिखली, निंबोडी, शेटफळ गढे, मदनवाडी, भिगवन स्टेशन आदी गावांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरे जलमय झाल्याने सुमारे 200 ते 250 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू यांसारख्या फळबागा, तसेच मका, कांदा, भुईमूग, चारा आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील माती वाहून गेली असून काही ठिकाणी पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे.
पाटील यांनी कृषी, महसूल व ग्रामविकास विभागांनी तातडीने पंचनामे पूर्ण करून, एकाही शेतकऱ्याला वंचित न ठेवता नुकसान भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
त्याचबरोबर पावसामुळे अनेक रस्त्यांवरील पूल व शेतांतील माती वाहून गेल्याने निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता, या भागांचीही पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
नीरा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि गरज भासल्यास पाटील यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.




