Marathwada Rain : नांदेडमध्ये आभाळ फाटलं; मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, ६ गावं पाण्याखाली, नागरिक अडकले

Nanded Heavy Rain : मराठवाड्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात हाहाकार माजवला आहे. रविवारी (१७ ऑगस्ट) मध्यरात्री ढगफुटीसदृश पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
या गंभीर पूरपरिस्थितीमुळे रावणगाव येथील गावठाणात ८० नागरिक आणि हसनाळ येथे ९ जण अडकून पडले आहेत. या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल (SDRF), उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली लहान होड्या आणि बोटींच्या साहाय्याने बचाव मोहीम सुरू आहे.
ढगफुटीसदृश पावसाने गावं जलमय
मुखेड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. मात्र, रविवारी मध्यरात्री १:३० ते २:०० च्या सुमारास उद्गीर परिसरातील धरणक्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने परिस्थिती बिकट झाली. स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यात पाऊस कमी झाला असला तरी उद्गीरच्या धरणक्षेत्रात प्रचंड पावसामुळे लेंडी नदीला पूर आला. लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाल्याने पूराची तीव्रता आणखी वाढली. परिणामी, एका रात्रीत नदीच्या पाण्याची पातळी तब्बल १८ फुटांनी वाढली असून सहा गावं पाण्याखाली गेली आहेत.
बचावकार्य आणि प्रशासनाचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली. रात्रीच चार गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले. मात्र, रावणगाव आणि हसनाळ येथील अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी SDRF ची विशेष पथके सकाळी ६ वाजल्यापासून कार्यरत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला असून, पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे, असे आमदार तुषार राठोड यांनी सांगितले. तरीही, पूरग्रस्त भागात बचावकार्य आणि सतर्कता कायम आहे.
मराठवाड्यातील येलदरी धरण तुडुंब
मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरातील सततच्या पावसामुळे आणि खडकपूर्णा प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याच्या आवकेमुळे धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून २३,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येलदरी धरण भरल्याने परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, आणि पूर्णा या पाच शहरांसह २०० खेड्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. तसेच, ७०,००० हेक्टरवरील शेतीपिकांना याचा फायदा होणार आहे.





