पुण्यात अजित पवार अन् जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार असून या बैठकीत शरद पवार अन् अजित पवार एकत्र भेटणार आहेत. या बैठकीला अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली आहे. त्यामुळे या भेटीपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. ते अजित पवार यांच्या गटात येणार असल्याचे म्हटले जाते. परंतु या चर्चांना जयंत पाटील यांनी अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय गटात याबाबत चर्चा थांबत नाही. आता शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुण्यात होत आहे. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या बैठकीत शरद पवार-अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्यापूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड गुप्तगू झाले.
सर्वाना काढले बाहेर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज गर्दी होती. परंतु जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांनाही बाहेर काढण्यात आले. अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बंद दाराआड चर्चा सुरु झाली.
जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार एकाच केबिनमध्ये एकत्र दिसून आले. वसंत दादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहे, त्यातच आता दोघांमध्ये झालेली चर्चेने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अशी राजकीय चर्चा रंगली आहे.





