satara | झेडपीतील बंद सीसीटीव्ही चोरट्यांच्या पथ्यावर

सातारा, (प्रतिनिधी) – मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत दररोज नवनवीन घटना घडत आहेत. जुनी व नवीन इमारत, मोठा परिसर यामुळे याठिकाणी भुरट्या चोऱ्या व अन्य गैरप्रकार होण्यास वाव आहे.
अनेक सीसीटीव्ही बंद असल्याने असे प्रकार करणाऱ्यांना एकप्रकारे बळ मिळत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने बंद सीसीटीव्हींची दुरुस्ती करुन अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागासह विविध ठिकाणांहून दैनंदिन कामासाठी दररोज हजारो नागरिक जिल्हा परिषदेत येतात. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये नेहमी गर्दी असते.
जुन्या व नव्या इमारतीत होणारी गर्दी, वाहन पार्किंग आदींमुळे जिल्हा परिषद व परिसर गजबजून जात असतो. जिल्हा परिषद व परिसराच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली असून ते त्यांचे काम चोख पार पाडत आहेत. मात्र अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याने आणि विस्तार मोठा असल्याने चोरट्यांचे फावत आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या आवारात अंधश्रध्देचे आघोरी प्रकार, वाहनतळांमधील वाहनांच्या चोऱ्या, ठेकेदारांची मारामारी, स्क्रॅपमधील वाहनांना आगी लागणे, झेडपीचे साहित्य चोरुन नेणे, भेट मिळालेले गरुडाचे कास्ट शिल्प गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.
मात्र, झेडपीतील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याने या प्रकरणांचा तपास करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.





