प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याबातची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर घडामोडींना वेग आला असून आमदार रोहित पवार यांनी देखील एकत्रित लढण्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. आता शहरातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १८ ते २० जागा देण्यात येणार आहे. तर उर्वरित १०८ ते ११० जागांवर अजित पवार यांची राष्ट्रवादी लढणार आहे.शहरामध्ये भाजपाने अद्याप जागावाटप व महायुतीबाबत अधिकृत घोषणा केली नाही. महायुतीचे जागा वाटप झाले नसून शिवसेना व भाजपची युती फिस्कटण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी घेतली असून रविवारी प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. शहरामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याचे पक्के झाले आहे. सुरूवातीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ६० जागांची मागणी केली होती. मात्र, एवढे उमेदवार नसल्याने ही मागणी ३० वर आली होती. त्यानंतर सातत्याने चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. अंतिमच्या बैठकीमध्ये १८ ते २० जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार शरद पवार यांच्या पक्षाला १८ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी दोन्हीही पक्षांनी तयारी सुरू केली असून सोमवारी (दि. २९) त्यांच्या अनेक उमेदवारांनी एबी पत्राशिवाय अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी त्यांना एबी पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. तुतारी की घड्याळ ? आघाडी झाली असली तरी कोणत्या चिन्हावर लढायचे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, ज्या पॅनेलमध्ये तीन उमेदवार घड्याळाचे आणि एक तुतारीचा आहे, तिथे चारही उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत. तर ज्याठिकाणी तुतारीचे उमेदवार तीन व घड्याळाचा उमेदवार एक असेल तिथे चारही उमेदवार तुतारी या चिन्हावर लढतील. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांमध्ये एकमत झाले असून त्याला पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. “दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित लढणार याबाबत निर्णय झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १८ ते २० जागा देण्याचे निश्चित झाले आहे. ३२ प्रभागांपैकी २७ ते २८ प्रभागांमध्ये आमचे उमेदवार नक्की झाले आहेत. भाजपाला तगडी फाईट देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार आहेत.” – योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट