क्रुरतेचा कळस : चार महिन्याच्या श्वानाला बेदम मारहाण करत संपवल

पुणे – जांभुळवाडी येथे वडिल आणि मुलानी चार महिन्याच्या श्वानाच्या पिल्लास बेदम मारहाण करत जीवे मारले. मारहाणीत त्याचा एक पाय मोडला तसेच डोक्यावर वर्मी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे आडोसा शोधत हे श्वानाचे पिल्लू त्यांच्या घराच्या पडवीत आले होते.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यानूसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समजमाध्यमात प्रसारित झाला होता.
याप्रकरणी पॉफेक्ट ॲनिलम सोसायटीच्या नीना राय (५८, रा.एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, प्राणी मित्र पियुष शहा यांनी आमच्याशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. आंबेगाव बुद्रुक येथील गवळीवाडा येथे, श्वानाच्या पिल्लाला बांबुने मारुन ठार केले आहे.
त्याचे व्हिडिओ व्हॉटसअपवर पाठवले. त्यानी प्रत्यक्षात जाऊन तेथे पहाणी केली असता, श्वानाचा मृतदेह आढळला नाही. तसेच मारहाण करणाऱ्या सचिन औरांगे आणि काशिनाथ औरांगे यांना विचारणा केली असता, त्यांनीही उडवा उडवीची उत्तरे दिली.
पावसात आडोसा शोधला आणि जीव गमावला या घटनेचा पाठपुरावा करणारे प्राणी मित्र पियुष शहा यांनी सांगितले की, शहरात पाऊस असल्यामुळे एक चार महिन्यांचे श्वानाचे पिल्लू अडोसा शोधत एका घरा जवळ गेले होते.
पावसामुळे ते पिल्लू त्या घराच्या अडोश्याला बसून राहीले.पाऊस थांबला पण पिल्लू जागेवरच बसून राहीले. पावसामुळे ते गारठल असावं. ते बसलेल पिल्लू घर मालकाने पाहिलं आणि मोठ्या जाड काठीने त्या पिल्लाला मारायला सुरुवात केली.
पिल्ला ने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला नराधमांनी त्या पिल्लाला डोक्यात जाड काठीने मारलं. त्या काठीच्या माराने पिल्लाने जागीच जीव सोडला. जीव गेलेला पाहूनही ते शांत बसले नाहीत तर त्याला पिल्लाला काठीने ढकलत लांब फेकून दिले.हे सर्व कृत्य करताना त्यांना काहीच वाटले नाही.
एक जीव आपल्या हाताने गेला आहे याचे गांभीर्य सुद्धा त्यांना नाही. काही श्वानप्रेमी त्यांना जाब विचारायला गेले असता त्यांना उडवा उडवीची उत्तर दिली. मारण्याची धमकी धमकी दिली तसेच पैशांचे आमिष हि दाखवले. परंतु श्वान प्रेमींनी त्या धमकीला न घाबरता आणि कोणत्याही अमिषाला बळी न पडता तक्रार दाखल केली आहे.
या घटनेचे चित्रीकरण शेजारी रहाणाऱ्या सोसायटीतील एका व्यक्तीने मोबाईलवर केले होते. त्याला आरोपींनी धमकी देत चित्रीकरण डिलीट करण्यास भाग पाडले.मात्र त्याने हा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकल्याने तो तसाच राहिला. त्यांनी यापुर्वीही असे कृत्य केले असल्याची शक्यता आहे. श्वान आक्रमक नव्हता तरीही जीव घेतला तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. क्रुरतेने मारहाण करुण असे प्रश्न सुटणार नाहीत अशी माहिती प्राणीप्रेमी ॲड. सुमित तरटे यांनी दिली.




