वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागांना फटका

कविता शेटे
सांगली – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकावर याचा परिणाम होत असून द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत. पहाटे दाट धुके, दुपारी कडाक्याचे ऊन तर कधी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष पिकांवर संकट कोसळले आहे. यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे.
अवकाळी पावसाततून मोठ्या कष्टाने वाचलेली द्राक्ष बाग निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातून जाते की काय अशी भीती बळीराजाला सतावत आहे.
सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने तासगाव, कवठेमहाकाळ, आटपाडी, जत तसेच मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक अशी द्राक्ष पिकाची ख्याती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरेच तरुण शेतकरी द्राक्ष पिकांकडे आकर्षित झाले.
परंतु सध्या विचित्र हवामानामुळे पीक जगणे मुश्किल झाले आहे. जिल्ह्यातील साठ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पिकांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. एक द्राक्ष बाग लावण्यासाठी दोन ते तीन लाखांचा खर्च येत असतो. करपा, दावण्या, भुरी मुळकुज आधी बुरशीजन्य रोगांची लागण झाल्याने वेलीवरील घड गळून पडत आहेत.
बाग वाचविण्यासाठी एकरी पाच हजार रुपयाचे औषध फवारणी करूनही हाती काही येईल याची खात्री नाही. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाचा गोडवा वाढण्याऐवजी आंबट द्राक्ष होऊ शकतात. तसेच थंडीमुळे मण्याच्या फुगवणीवर परिणाम होऊ लागला आहे.
सांगली जिल्ह्यातील वातावरण द्राक्ष पिकासाठी अनुकूल आहे. येथील द्राक्ष ही निर्यातक्षम आहेत. युरोपीय देशातून या द्राक्षांना मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे अर्थार्जन होत असल्याने शेतकरी ऊस लागवड ऐवजी द्राक्ष बाबांकडे आकर्षित झाला आहेत. जिल्ह्यात द्राक्षांची उलाढाल एक ते दोन हजार कोटीच्या घरात आहे.
परंतु लहरी हवामानामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घालून तर महापुराच्या काळात ही जगवलेली द्राक्ष बाग बळीराजाला हवामानाच्या परिस्थितीमुळे अडचणीत आणत आहे. द्राक्ष खरेदीसाठी जिल्ह्यात व्यापारी दाखल झाले आहेत. मात्र पावसाने द्राक्षांचे नुकसान झाल्यामुळे हंगाम लांबणीवर पडला आहे.
यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येण्याची शक्यता आहे. सध्या केवळ जिल्ह्यात 5% हंगाम सुरू आहे. उशिरा फळ छाटणी झालेल्या भागात 60 ते 80 दिवसांच्या बागा आहेत. मात्र द्राक्ष उत्पादनावर परिणाम होत असल्यामुळे द्राक्षांच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही बळीराजाला याचा फायदा होणार का? व हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नुकसानातून द्राक्ष पीक वाचवण्याची शेतकऱ्याची धडपड यशस्वी होईल का? याकडेच बळीराजाचे लक्ष लागले आहे.





