मुंबईतील सर्व रस्ते मोकळे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवण्याचं काम सुरू

Manoj Jarange | मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनामुळे सीएसएमटी, बीएमसी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
मराठा आंदोलकांनी मुंबईचे महत्त्वाचे रस्ते अडवून वाहतूककोंडी केली. रस्त्यावर जेवण बनवून संपूर्ण शहराचे जीवन ठप्प केल्याबाबत एमी फाउंडेशनने अंतरिम अर्ज दाखल केला. याचिकाकर्त्यांनी तातडीची सुनावणी घेण्यासाठी रविवारी न्यायालयाच्या निबंधकांना विनंती केली. सोमवारी न्यायालयाला गणपतीची सुट्टी असतानाही या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी विशेष खंडपीठाची नियुक्ती करण्यात आली.
यावर न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम आंखड यांच्या विशेष खंडपीठाने मुंबईचे जनजीवन ठप्प करू शकत नाही, असे म्हटले .मनोज जरांगे आणि इतर आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या अटींचे प्रथमदर्शनी उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले.
जरांगे आणि मराठा आंदोलकांनी २६ ऑगस्ट रोजीच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि पोलिसांनी आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीचे उल्लंघन केल्याने, आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे आणि स्वच्छ केले नाहीत तर सरकारने त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने विशेष स्पष्ट केले.
सरकारने अंमलबजावणी का केली नाही?
त्याच वेळी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला खारघरमध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने केलेली असताना सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा करून न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला.
दुसरीकडे जरांगे यांनी राज्यभरातील मराठ्यांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली व मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीबाहेर रोखण्याचे आणि तेथूनच परत पाठवण्याचे आदेश सरकारला दिले. आमरण उपोषण करणाऱ्या जरांगे यांची तब्येत बिघडल्यास सरकारने त्यांची वैद्यकीय तपासणी करावी आणि काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
CSMT परिसरातील मराठा आंदोलनाच्या गाड्या काढण्यात सुरुवात
न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई महानगरपालिका आणि CSMT परिसरातील मराठा आंदोलनाच्या गाड्या आता काढण्यात सुरुवात केली आहे. ज्यामुळं या गाड्या आता वाशीच्या दिशेने पार्किंगसाठी जातील आणि मोठ्या प्रमाणात ज्या मराठा आंदोलनाच्या ट्रक होते तेसुद्धा आता पोलिसांमार्फत या भागातून काढण्यात येत आहे. हायकोर्टानं महत्त्वाचे आदेश दिल्यानंतर त्याबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी दुपारी 3 वाजता होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशावर जरांगे काय म्हणाले ?
न्यायालयाच्या आदेशानुसार मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थक आंदोलकांना रस्त्यावर लावलेल्या गाड्या हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या. मुंबईकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा आपापल्या गावी परत निघून जा, असा सज्जड दमही जरांगे यांनी आंदोलकांना भरला. समाजाचा अपमान होईल, समाजाची मान खाली जाईल, असे वागायचे नाही, असे त्यांनी समर्थकांना बजावले.
हेही वाचा:
Pune News | सीएचबी प्राध्यापकांना सात दिवसांत मानधन द्या ; उच्च शिक्षण संचालकांचे निर्देश





