Pimpri : मैत्री दिनानिमित्त स्वच्छता मोहिम
वडगाव मावळ : मैत्री दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत प्रशांतदादा भागवत युवा मंचतर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. तळेगाव चाकण रस्त्यावरील माळवाडी, इंदोरी बायपास व सुधापूल परिसरात ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
रविवारी (दि. ३) झालेल्या या उपक्रमात नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मोहिमेदरम्यान ‘‘कचरा टाकू नका’’ अशा नामफलकांचे प्रदर्शन करत रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले.
मैत्री दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेस मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट दिली. त्यानंतर सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज जगनाडे मंदिर जिर्णोद्धार व विकास आराखडा कामाची पाहणी तहसीलदार श्री देशमुख यांनी केली. त्याप्रसंगी श्री संत संताजी जगनाडे महाराज संस्था सुदुंबरेचे विश्वस्त प्रशांत भागवत यांनी विकास आराखडा संदर्भात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना माहिती दिली.
या उपक्रमात इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे, सुदवडीचे उपसरपंच गुलाब कराळे, माजी उपसरपंच नितीन शिंदे, संतोष काळे, विनोद भागवत तसेच युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





