नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठे दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ओडिशात त्यांच्या पक्षाला लोकसभेच्या १७ जागांवर विजय मिळणार असून विधानसभेतही भाजप क्लीन स्वीप करेल. या मुलाखीत अमित शहा यांनी पाच भविष्याणीही केल्या आहेत. शहा पहिला दावा करताना म्हणाले की शेअर बाजारात नवीन विक्रम प्रस्थापित होणार आहे. सध्या होत असलेल्या चढ- उताराबद्दल ते म्हणाले की पूर्वीही अनेकदा असे झाले आहे. वेगवेगळ्या कारणांनी हा चढ- उतार पाहायला मिळतो. मात्र तुम्ही एक गोष्ट लिहून ठेवा की चार जूननंतर शेअर बाजारात नवीन विक्रम प्रस्थापित होईल. शहांनी दुसरी भविष्यवाणी ओडिशा या राज्याच्या संदर्भात केली. तेथील लोकसभेच्या १७ जागा भाजप जिंकेल असे सांगतानाच विधानसभा निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळून आम्ही सरकार स्थापन करू असे ते म्हणाले. तेथील ढिसाळ कारभाराला लोक वैतागले असल्याचा दावाही शहांनी केला. राम मंदिरात जाण्यापासूनही लोकांना रोखले जात असून यावेळी सत्तांतर घडवून आणण्याचा निश्चय लोकांनी केला असल्याचे ते म्हणाले. तिसरी भविष्यवाणी त्यांनी दक्षिण भारताच्या संदर्भात केली. यावेळी भाजपची कामगिरी द. भारतात चांगली असेल आणि आंध्र प्रदेशात मित्र पक्षांच्या सहकार्याने आमचे सरकार येईल असे ते म्हणाले. दरम्यान, सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मोठा दावा करताना ते म्हणाले की पहिल्या तीन टप्प्यांत २८३ जागांसाठी मतदान झाले आहे. त्यातील १९० जागा भाजपने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे १९० जागा जिंकण्याची शक्यता अथवा जिंकू असे शहा यांनी म्हटले नाही तर आम्ही १९० जागा जिंकल्या असल्याचे थेट त्यांनी म्हटले आहे. आज सोमवारी चौथ्या टप्प्याचे मतदान झाले असून अजून तीन टप्पे बाकी आहेत. त्यात त्यांनी आताच एवढा मोठा दावा केल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये चलबिचल होणे स्वाभाविक आहे.