परीक्षा केंद्रावर दीड तास आधीच पोहचा

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावी लेखी परीक्षेसाठी शाळा, विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. किमान एक-दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक असणार आहे.
एप्रिल-मेमध्ये ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे तापमान मोजण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी 30 मिनिटे आधी विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी जावे लागणार आहे. लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येणार आहे.
परीक्षेदरम्यान पुरेसे अंतर ठेवून बैठक व्यवस्था असणार आहे. परीक्षेवेळी एखाद्या विद्यार्थ्यास करोनामुळे त्रास झाल्यास व त्याची परीक्षा देण्याची इच्छा असल्यास विद्यार्थ्यांच्या संमतीने त्याची परीक्षा केंद्रात स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी व संपल्यानंतर गर्दी टाळण्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा संचालनाची संपूर्ण जबाबदारी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर असणार आहे.
लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातच घेण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत एकापेक्षा अधिक महाविद्यालये एकत्र करून परीक्षा घेण्यात येणार आहेत. एखाद्या विद्यार्थी आरोग्यविषयक कारणामुळे परीक्षेस गैरहजर राहिल्यास त्याचा परीक्षा क्रमांक, विषय व अन्य माहिती त्याच दिवशी विभागीय मंडळाकडे नोंदवली जाणार आहे. या गैरहजर विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा जूनमध्ये होणार आहे. विशेष परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाही.





