दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र गुरुवारपासून उपलब्ध

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या इयत्ता दहावी, बारावीच्या जुलै- ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना येत्या गुरुवार (दि. ४) पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून शाळा लॉगिनमधून उपलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव यासंदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास त्याची पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यावे, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी दिली आहे.





