पुणे | क वर्गाची भरतीसुध्दा एमपीएससी मार्फत करणार

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – शासकीय सेवेतील विविध पदांसाठीची परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे. गट क संवर्गांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबतचा प्रश्न अधिवेशानत आमदारांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली.
शिक्षक, तलाठी , आरोग्य आदींसह विविध परिक्षांमध्ये होणार्या पेपरफुटी व गैरव्यवहारांच्या प्रकरणामुळे या परिक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती.
तसेच, शासकीय सेवेतील गट क वर्गाच्या पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत रबविण्याकरीता सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यासाठीचा निर्णय 2022 मध्ये घेण्यात येऊन प्रशासकीय पातळीवर याची अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही शासकीय भरती प्र्क्रिया खासगी कंपनीमार्फत सुरु असल्याचे निदर्शनास आले, यावर आमदारांनी प्रश्न विचारला होता.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, शासन निर्णय दि. 2 नोव्हेंबर 2022 नुसार गट क मधील फक्त लिपिक वर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र सेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आली आहेत.
लिपिक वर्गीय संवर्गातील प्रथम टप्प्यात लिपिक टंकलेखकची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहे. गट क मधील अन्य पदांच्या पदभरतीसाठी स्पर्धा परिक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार टीसीएस व आयबीपीएस या खासगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत आहेत.





