नवी मुंबईत रस्त्यावर सापडल्या बारावीच्या उत्तरपत्रिका

नवी मुंबई : राज्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरू असून पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथे बारावीच्या उत्तरपत्रिका सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणी बोर्डाकडून नियमानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विभागाच्या प्रभारी विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.
बारावीच्या बुककीपिंग विषयाची परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी झाली होती. त्याच्या 25 उत्तरपत्रिका कामोठे बस स्टॉपच्या जवळ झाडीत टाकलेल्या आढळल्या. काही कामानिमित्ताने गुरुवारी (6 मार्च) सकाळी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल कामोठे बस स्टॉपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतुहूल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना माहिती दिली. कामोठे बस स्टॉपच्या मागे झाडात 25 उत्तरपत्रिका सापडल्या. यातील काही उत्तरपत्रिका फाटलेल्या होत्या. एका जेसीबीचालकाने काही मुलांना पेपर टाकताना पाहिले होते, अशी माहिती अदिती सोनार यांनी दिली.
कळंबोलीतील एका शिक्षकाकडे या उत्तरपत्रिका तपासायला आल्या होत्या. त्या शिक्षकाने बुधवारी (5 मार्च) कामोठे पोलीस ठाण्यात उत्तरपत्रिकेचा एक गठ्ठा (25 उत्तरपत्रिका) हरवल्याचे सांगितले होते. तसेच कुणी उत्तरपत्रिका घेऊन आल्यास आपल्याला कळवा, असेही सांगितले होते. ते तपासलेल्या उत्तरपत्रिका दुचाकीवरून मॉडरेटरकडे घेऊन जात असताना त्यांच्या पिशवीतून एक गठ्ठा पडल्याचे त्यांनी सांगितले.




