शिक्षिकेच्या घरात 12 वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक; प्राचार्यांवर गुन्हा दाखल

Virar News | एका शिक्षिकेच्या घराला आग लागून त्यात बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली होती. ही घटना १० मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोलींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली होती. या घटनेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार का? तसेच असे पेपर घरी आणता येतात का? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी विरारमधील प्राचार्य आणि शिक्षकांवर बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीररित्या या उत्तरपत्रिका घरी नेण्यात आल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या होत्या.
नेमकं काय घडलं?
बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली होती. या शिक्षिकेने १२ वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंगसाठी घरी आणले होते. या पेपरचा गठ्ठा त्यांनी सोफ्यावर ठेवला होता. काही वेळाकरिता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले होते.
त्यावेळी शिक्षिकेचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. उत्तर पत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत बोळींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जळालेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.
उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणे कायद्याने चुकीचेच : दादा भुसे
याबाबत बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, शिक्षिका घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या. हे कायद्याने चुकीचेच आहे. उत्तरपत्रिका जळाल्या असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पण विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण त्या उत्तरपत्रिकांची तपासणी होऊन गुणपत्रिका तयार आहेत. त्यांनी केलेल्या या विधानामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.





