Thane Crime : ठाण्यात दोन गटांत संघर्ष.! गोळीबारात पादचारी जखमी; ७ जण ताब्यात
गोळीबाराच्या या घटनेच्या संदर्भात आम्ही आतापर्यंत दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Thane Crime – ठाणे जिल्ह्यात दोन गटांतील संघर्षावेळी झालेल्या गोळीबारात ३४ वर्षीय पादचारी जखमी झाला आहे. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास कल्याणमधील खडेगोळावली भागात ही घटना घडली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
एका किरकोळ वादाचे रूपांतर दोन गटांमधील संघर्षात झाले. त्यादरम्यान एका गटातील सदस्याने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. या गोळीबारात राहुल वर्मा यांना गोळी लागली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन गटांमधील वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या हिंसाचारानंतर दोन्ही बाजूंनी पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. गोळीबाराच्या या घटनेच्या संदर्भात आम्ही आतापर्यंत दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी सांगितले.






