खळबळजनक ! विनोद तावडेंना जिथे पकडलं, त्याच हॉटेलच्या एका रुममध्ये सापडल्या 7 महिला

विरार : विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना विरारमध्ये मोठा राडा झाला आहे. भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आणि हा सगळा प्रकार समोर आला. त्यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तसेच याच हॉटेलमध्ये एका रुममध्ये 7 महिला आढळून आल्या. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विरारमधील हॉटेल विवांतमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच वेळी बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना घेराव घातला आणि जाब विचारण्यास सुरुवात झाली.
विरारमधील हॉटेल विवांतमध्ये बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्ते, पोलिसांसह हॉटेलच्या काही रुमची झडती घेतली. त्याच वेळी 7 महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचे सांगितले. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याचे या महिला म्हणाल्या आहेत.
हितेंद्र ठाकुरांनी केला मोठा गौप्यस्फोट
बविआचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यादरम्यान मोठा गौप्यस्फोट केला. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.





