झारखंडच्या चाईबासा येथे चकमक; चार नक्षलवाद्यांचा खात्मा, अनेक रायफल्स जप्त

Jharkhand | naxalites killed – सुरक्षा दलांनी आपली तपास मोहिम तीव्र केल्यानंतर झारखंडमधील चाईबासा येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत.
मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या संघटनेचा एक झोनल कमांडर, एक सब-झोनल कमांडर आणि एरिया कमांडरचा समावेश आहे. अन्य दोन एरिया कमांडरना अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडून अनेक रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. टोंटो आणि गोइलकेरा भागात ही घटना घडली.
झारखंड पोलिसांचे प्रवक्ते आणि आयजी अमोल व्ही. होमकर म्हणाले, नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले, तर इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पोलीस शोध मोहिमेसाठी बाहेर पडले होते. यादरम्यान टपून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यात चार नक्षलवादी ठार झाले.
झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात पोलिसांनी १५५ किलो ड्रग्जसह चार जणांना अटक केली. त्याची किंमत २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सिमडेगा पोलीस अधीक्षक म्हणाले की,
त्यांना माहिती मिळाली होती की ओडिशामधून अमली पदार्थांची मोठी खेप उत्तर प्रदेशात आणली जात आहे. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.





